Friday, July 3, 2009

गगना गंध आला...

...यावेळी पावसाची चातकापेक्षाही अधिक आतुरतेने वाट पाहात होतो. कंटाळलेल्या मनाने मग कुमार गंधर्वांचा मारवा आणि मग किशोरी आमोणकरांचा मेघ मल्हार ऐकला. कदाचित ते स्वर्गीय स्वर आळवले गेले असल्याने मुंबईत तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झालीये.

खिडकीतून पाहता येणारी आणि ऐकता येणारी पावसाची रिपरिप, आणि कुमारांचा आलाप, हा खरचं एक स्वर्गीय आनंद आहे. या निमित्तान संगीतावर ( ज्याची दुर्देवाने आता साथ सुटते आहे असं वाटतय ! ) काही काळ चिंतन केले...याच चिंतनाचा काही भाग तुमच्यासाठी....तुमच्या मनातील चिंतनही या निमित्ताने मी प्रतिक्रियांच्या माध्यमातून अपेक्षित आहे, या निमित्ताने धकाधकीच्या आयुष्यात थोडे मंथन होईल, अशी आशा मनाशी आहे.

शास्त्रीय संगीत जितका अभिजात प्रकार तितकाच काहीसा (काहींसाठी कंटाळवाणा), त्यामुळेच मग भावसंगीत या मातीत चांगलेच रुजले. किंबहुना शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातून उगम पावलेली, तरीही शास्त्रीय संगीताकडे पूर्णतः न झुकलेली शब्दप्रधान गायकी ‘भावसंगीत’ या संज्ञेने ओळखली जाते. शब्द, सूर, ताल, लय, आणि काव्यानुसार व्यक्त होणार्‍या संमिश्र भावना यांचा सुंदर मिलाफ म्हणजे ‘भावसंगीत’.
संगीताचा हा प्रकार म्हणजे महाराष्ट्रातील संगीत क्षेत्राचे अनोखेपण अधोरेखित करणारे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंधात गायक कलाकारालाच नव्हे तर गीतकार, संगीतकार यांनाही अनेक प्रकारची कलात्मक व्यवधाने सांभाळावी लागतात. शब्दामागील स्वरांना किती स्पर्श करायचा, चालीतील दोन शब्दांतील अंतर, त्या शब्दांवर दिलेल्या विशिष्ट स्वरसंगती, स्वरसमूहातील अंतर आणि त्यामागील भावार्थ समजून काव्य तरल स्वरात मांडणे - हा भावसंगीताचा गाभा आहे. या गायकीसाठी गळ्याची वेगळी तयारी हवी, शब्दफेक तरल हवी, शब्द टाकण्याच्या पद्धतीत एक उत्कटता हवी, काव्यातलं ‘एक्स्प्रेशन’ गाण्यात मांडण्याची ताकद हवी, गाणार्‍याची तन्मय भाववृत्ती हवी -केवळ ताना, बोल ताना, सरगम घोटून हे येत नाही. हवा तो स्वर आवश्यक तितक्याच तीव्रतेने लागायला हवा. या सार्‍यांच्या जोडीला कलाकाराची वैयक्तिक प्रतिभा, शब्द आणि त्यांचे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंग्यार्थ शोधण्याची वृत्ती, संगीतकाराने सांगितलेली चाल आत्मसात करण्याची क्षमता आणि सादरीकरणातील मनःपूर्वकता - यांची नितांत आवश्यकता असते.

कवितेला जसे वृत्त असते, तशीच भावसंगीत गायनाची एक वृत्ती जोपासावी लागते. त्यासाठी काव्याची उत्तम, तरल जाण लागते. भावसंगीत हा गीतकार, संगीतकार, वादक आणि गायक यांनी सजवलेला संगीतरथ असतो. शब्द जितके सुंदर, जितके नेमके, तितकी चाल, सूर सहज उमटतात. अनेकदा ते शब्दच सूर घेऊन येतात. त्यांना नटवण्याचे काम संगीतकाराची प्रतिभा करते. कवी आणि संगीतकार मिळून एक ‘म्यूझिकल फ्रेमवर्क’ तयार करतात. त्याचे कानेकोपरे सुरेल करून उजळण्याचे काम गायक करतात.

कला ही आनंदनिर्मितीसाठी असल्याने सर्वांपेक्षा आनंदरस महत्त्वाचा असतो. मीलनाचे वा विरहाचे गीत असले, तरी ऐकणा-याला त्यातून आनंदाची अनुभूती येणे महत्त्वाचे असते...

काहीही असो...पाऊस आला आणि गगना गंध आला !

1 comment:

Seriously Funny said...

Hi manoj,

Ur piece on MJ is xcellent. You have mentioned that for many Indians idnentity of MJ is of dancer than musician and singer, i am one of them. By the way i dont understand much about the gr8 art of music xcept listening, ur writings (other feature on music) found interestng and touching. Keep it up. Last but not least, while starting the blog u hv u raised the queries like why we r here / whats the purpose / where we are leading towards etc. these are the questions raised by the any intellectual or vichari human beings. but i think we r here as an accident / no purpose / nowhere to go / no point in wasting time on these issues but we r here to just hv a fun. cheers. :)
Yogesh Mehendale