Saturday, October 18, 2008

मेरी आवाजही पेहचान है !

नियमितपणे आजही रेस्त्रॉँमध्ये रात्रीचे जेवण झाले. पण आजचं रेस्त्रॉँ वेगळं होतं. त्याचं नाव आहे अवन फ्रेश. शिवाजी पार्क...
कुठे गेलो याचा रेफरन्स एवढ्यासाठीच कि तिथे पाहिलेली आणि जाणवलेली घटना अंतर्मुख करून गेली.
वास्तविक शनिवारची रात्र...मुंबईकरांसाठी जीवाची मुंबई करणारी रात्र. माझ्याप्रमाणेच रेस्त्रॉँमध्ये गर्दी होती ती विविध वयोगटातील जोडप्यांची. अर्थातच वेंटिग असल्यानं काऊंटरवर कल्ला सुरू होता. 15 ते 20 मिनिटांच्या वेटिंगनंतर जागा मिळाली...भूक लागल्यानं पद्धतशीर ऑर्डर दिली...
...आणि
ऑर्डर येईपर्यंत, आल्यानंतर आणि जेवण संपेपर्यंत एक गोष्ट अस्वस्थ करून गेली ती म्हणजे आजूबाजूला बसलेल्या जोडप्यांत 80 टक्के जोडपी ही माझ्या वयाची होती. जोडपी म्हणजे केवळ नवरा आणि बायको...मुलं नाहीत.
त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा संवादच नव्हता...पहिल्यांदा वाटलं दिवसभराच्या आणि आठवडाभराच्या थकावटीमुळं एकमेकांत संवाद नसेल...पण बराच वेळ निरिक्षण केल्यावर लक्षात आलं की, अरे यांच्यातला संवादच खुंटला आहे....त्या दोघांत विलक्षण शांतता आढळली
माझ निरिक्षण जर खरं असेल तर...
...हे तर फार विचित्र आहे.
याचं कारण म्हणजे असं असेल तर ही एक अत्यंत धक्कादायक बाब आहे.
साताजन्माच्या किंवा जन्मजन्माच्या प्रेमावर अन विवाहबंधनावर माझा विश्वास नाही, पण किमान हा जन्म ज्याच्याबरोबर काढायचाय, त्यांच्यात असा विसंवाद ?
बहुतेकांनी सवयीप्रमाणे आपल्या जोडीदाराच्या पसंतीची डिश ऑर्डर तर केली...
...अन् अनेक जण तर साधं आपल्या जोडीदाराच्या डोळ्यात पाहाणंही टाळत होते...
का होत असेल असं ?
भयावह वेगवाग झालेल्या आयुष्यात मागे काही शिल्लक आहे का, याचा आढावाही घ्यायला वेळ नसावा ?
कुणाकडे या समस्येचं काही उत्तर असेल तर कृपया मला सांगा...