Sunday, July 19, 2009

प्रश्नांच्या या अथांग कल्लोळात...

सध्या सगळीकडे एक गोष्ट कायम ऐकायला येते की, मी फारच बिझी आहे. बिझी असणे हा जणू परवलीचाच शब्द बनलाय...पण नक्की बिझी असण्याची अवस्था म्हणजे काय असते ?
मानवाला मिळालेली दैवी देण म्हणजे मन. बिझी असण्यात मन किती बिझी असते, याचा सखोल विचार केला तर लक्षात येईल की बिझी म्हणवणा-या देहात असलेले मन खरोखरच बिझी आहे की सगळा नुसताच व्यर्थबोध !
मनाप्रमाणे काम नसले की माणसे केवळ शरीरारने कार्यरत असतात, आणि मनाप्रमाणे काम मिळाले तरी शारिरीक श्रमापासून सुटका नाही. तर अशावेळी मनाचा विचार कितीवेळा होतो...
अनेक दिवसांनी केवळ मनाचा विचार करण्यासाठी काही वेळ राखून केवळ मनाचा विचार केला. त्यावेळी मनामध्ये अनेक दिवसांपासून, अनेस विषयांवरच्या प्रश्नांचा केवळ कल्लोळ झालेला दिसला....या कल्लोळाला असलेली अथांगता पाहून मनात प्रचंड भीती निर्माण झाली...
...वाटलं की, मनात निर्माण झालेले एवढे प्रश्न, म्हटलं तर थेट आपल्याशी आणि आपल्या सभोवताली असणा-यांशी संबंधित...कधी सोडवणार आपण हे प्रश्न आपल्या बिझी असण्यातून....केवळ बिझी नाही तर मानवी जीवनातील असमाधानही कायम आहे, द्वंद्व संपत नाही, द्वेष-हेवा-मत्सर-स्वार्थ यांचा मनावरील पगडा जात नाही.

अशावेळी काय करायचे ?

प्रश्नांच्या या अथांग कल्लोळात मी खोलवर बुडून गेलोय...

Friday, July 3, 2009

गगना गंध आला...

...यावेळी पावसाची चातकापेक्षाही अधिक आतुरतेने वाट पाहात होतो. कंटाळलेल्या मनाने मग कुमार गंधर्वांचा मारवा आणि मग किशोरी आमोणकरांचा मेघ मल्हार ऐकला. कदाचित ते स्वर्गीय स्वर आळवले गेले असल्याने मुंबईत तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झालीये.

खिडकीतून पाहता येणारी आणि ऐकता येणारी पावसाची रिपरिप, आणि कुमारांचा आलाप, हा खरचं एक स्वर्गीय आनंद आहे. या निमित्तान संगीतावर ( ज्याची दुर्देवाने आता साथ सुटते आहे असं वाटतय ! ) काही काळ चिंतन केले...याच चिंतनाचा काही भाग तुमच्यासाठी....तुमच्या मनातील चिंतनही या निमित्ताने मी प्रतिक्रियांच्या माध्यमातून अपेक्षित आहे, या निमित्ताने धकाधकीच्या आयुष्यात थोडे मंथन होईल, अशी आशा मनाशी आहे.

शास्त्रीय संगीत जितका अभिजात प्रकार तितकाच काहीसा (काहींसाठी कंटाळवाणा), त्यामुळेच मग भावसंगीत या मातीत चांगलेच रुजले. किंबहुना शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातून उगम पावलेली, तरीही शास्त्रीय संगीताकडे पूर्णतः न झुकलेली शब्दप्रधान गायकी ‘भावसंगीत’ या संज्ञेने ओळखली जाते. शब्द, सूर, ताल, लय, आणि काव्यानुसार व्यक्त होणार्‍या संमिश्र भावना यांचा सुंदर मिलाफ म्हणजे ‘भावसंगीत’.
संगीताचा हा प्रकार म्हणजे महाराष्ट्रातील संगीत क्षेत्राचे अनोखेपण अधोरेखित करणारे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंधात गायक कलाकारालाच नव्हे तर गीतकार, संगीतकार यांनाही अनेक प्रकारची कलात्मक व्यवधाने सांभाळावी लागतात. शब्दामागील स्वरांना किती स्पर्श करायचा, चालीतील दोन शब्दांतील अंतर, त्या शब्दांवर दिलेल्या विशिष्ट स्वरसंगती, स्वरसमूहातील अंतर आणि त्यामागील भावार्थ समजून काव्य तरल स्वरात मांडणे - हा भावसंगीताचा गाभा आहे. या गायकीसाठी गळ्याची वेगळी तयारी हवी, शब्दफेक तरल हवी, शब्द टाकण्याच्या पद्धतीत एक उत्कटता हवी, काव्यातलं ‘एक्स्प्रेशन’ गाण्यात मांडण्याची ताकद हवी, गाणार्‍याची तन्मय भाववृत्ती हवी -केवळ ताना, बोल ताना, सरगम घोटून हे येत नाही. हवा तो स्वर आवश्यक तितक्याच तीव्रतेने लागायला हवा. या सार्‍यांच्या जोडीला कलाकाराची वैयक्तिक प्रतिभा, शब्द आणि त्यांचे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंग्यार्थ शोधण्याची वृत्ती, संगीतकाराने सांगितलेली चाल आत्मसात करण्याची क्षमता आणि सादरीकरणातील मनःपूर्वकता - यांची नितांत आवश्यकता असते.

कवितेला जसे वृत्त असते, तशीच भावसंगीत गायनाची एक वृत्ती जोपासावी लागते. त्यासाठी काव्याची उत्तम, तरल जाण लागते. भावसंगीत हा गीतकार, संगीतकार, वादक आणि गायक यांनी सजवलेला संगीतरथ असतो. शब्द जितके सुंदर, जितके नेमके, तितकी चाल, सूर सहज उमटतात. अनेकदा ते शब्दच सूर घेऊन येतात. त्यांना नटवण्याचे काम संगीतकाराची प्रतिभा करते. कवी आणि संगीतकार मिळून एक ‘म्यूझिकल फ्रेमवर्क’ तयार करतात. त्याचे कानेकोपरे सुरेल करून उजळण्याचे काम गायक करतात.

कला ही आनंदनिर्मितीसाठी असल्याने सर्वांपेक्षा आनंदरस महत्त्वाचा असतो. मीलनाचे वा विरहाचे गीत असले, तरी ऐकणा-याला त्यातून आनंदाची अनुभूती येणे महत्त्वाचे असते...

काहीही असो...पाऊस आला आणि गगना गंध आला !

Friday, June 26, 2009

एका शापित गंधर्वाचा अंत...

मायकल जॅक्सन मेला !...एका शापित गंधर्वाचा हा अंत अत्यंत चटका लावून गेला...मायकल मेला..असं म्हणताना मनाला यातना होताहेत...पण 'तो मेला' हे क्रियापद केवळ त्याच्यावरील प्रेमापोटीच.
शाळेत असल्यापासूनच विशेषतः जेव्हापासून पाश्चात्य संगीत कळायला लागलं, त्याबद्दल माहिती झाली तेव्हा एलिटन जॉन असेल, जॉर्ज मायकल असेल किंवा अन्य कोणी...पण कायम पारायण ज्याच्या गाण्यांचे केले तो एकमेव मायकल जॅक्सन होता..
मायकलच्या प्रत्येक गाण्यात किंवा अल्बममध्ये केवळ व्यावसायिक एप्रोज नव्हता तर त्याला एक थीम होती...ही थीम केवळ मार्केटिंगसाठी नव्हती तर त्या थीमला एक सामाजिक आशय होता...
कलाकाराने त्याची प्रतीभा जर सामाजिक भान राखून समाजकारणासाठी वापरली तर त्याचा परिणाम किती आणि कसा साधला जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मायकल जॅक्सन. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास व्हिएतनाम युद्धाच्यावेळी अमेरिकेने विशेषतः 'काळ्या' लोकांच्या हिंसेविरोधात मायकल जॅक्सनने अशाच पद्धतीने आपल्या गीताच्या माध्यमातून आवाज उठवला होता...त्या गीताच्या काही ओळी खालीलप्रमाणे...
"Heal The World"
There's A Place InYour HeartAnd I Know That It Is Love
And This Place CouldBe MuchBrighter Than Tomorrow
And If You Really TryYou'll Find There's No Need To Cry
In This Place You'll FeelThere's No Hurt Or Sorrow
There Are WaysTo Get There
If You Care EnoughFor The Living
Make A Little Space
Make A Better Place
...Heal The World
Make It A Better PlaceFor You And For Me
And The Entire Human Race
There Are People Dying
If You Care Enough
For The Living
Make A Better PlaceFor You And For U and For me.
एखाद्या व्यक्तीची विशेषतः कलाकाराची संवेदना जोपर्यंत जागृत असते तोपर्यंतच त्याची निर्मितीक्षमता शाबूत असते...मायकलमध्ये ही संवेदना तो मरेपर्यंत कायम होती...त्याच्यातली संवेदना जशी त्याच्या निर्मितीक्षमतेचा स्त्रोत होती, तशीच त्याच्या आजूबाजूला वावरणा-या व्यक्तींच्याही निर्मितीक्षमतेचा स्त्रोत होती, याचे उदाहरण मायकलची सख्खी बहिण जेनेथ जॅक्सन...
मायकलच्या कलेबद्दल तर काय बोलावं, शब्दच म्यान होतात. गोड-कडू अशा अनेक आठवणींच्या हिंदोळ्यावर असलेले मायकलचे आयुष्य कधी सावरलेच नाही...जगाला आपल्या तालावर थिकरवणा-या मायकेलने आयुष्यात असे अनेक दाहक अनुभव घेतले....
पण तरीही काहींना प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची कला चांगली जमते. 'बाय हूक ऑर बाय क्रूक' हे त्यांच्यासाठी वेगळ्या अर्थाने लागू होतं. मायकेल जॅक्सनही त्यापैकीच एक. काही वेळा तर तो प्रसिद्धीच्या मागे लागण्यापेक्षा (अप)प्रसिद्धीच त्याच्या मागे लागली. ७० च्या दशकात अमेरिकेला स्वत:च्या संगीतावर झुलायला लावलेला जॅक्सन जगभर प्रसिद्ध झाला, ते त्याच्या डान्समधल्या कॉम्प्लिकेटेड स्टेप्सनी.
रॉक, पॉप हे वेस्टर्न कल्चर. भारतातल्या हाय क्लासला या कल्चरची ओळख असली, तरी मुंबईतल्या चाळीपर्यंतही हे कल्चर पोहोचवलं ते मायकेल जॅक्सन आणि मडोनाने. अमेरिकेत पॉप म्युझिकच्या प्रेझेण्टेशनमधे एकीकडे कमालीचा बदल करतानाच डान्समधल्या त्याच्या फिजिकली कॉम्प्लिकेटेड स्टेप्सनी सर्वांनाच वेड लावलं. डान्स करताना हा माणूस हाडं बाजूला काढून ठेवतो का, याला गुरुत्वाकर्षणाचे नियमही लागू होत नाही का, असे प्रश्न गमतीने विचारले जात होते. याच दरम्यान मायकेलने नाकाचा शेप बदलण्यासाठी त्यावर १७ शस्त्रक्रिया केल्याची चर्चाही होती. पॉप म्युझिकवर डान्स करताना मायकेलने केलेल्या स्टेप्स महत्त्वाच्या मानल्या जाऊ लागल्या. वेस्टर्न डान्स हे जॅक्सनच्या स्टेप्सशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, अशी भावना गेल्या दशकापर्यंत होती. जॅक्सनच्या या स्टेप्सपैकी सर्वात हिट ठरल्या, त्या रोबोट आणि मूनवॉक. हात हवेत स्थिर ठेवत हवेत चालण्याची कसरत नंतर बॉलिवूडच्या नायकांनीही अनेकदा करून दाखवली. एक वेळ अशी आली, की संगीतापेक्षा मायकेलचा डान्सच अधिक महत्त्वाचा ठरला...
असो, काही असलं तरी मायकल जॅक्सन आज गेला....असं म्हणतात की गंधर्वांना सर्व कला अवगत असतात, हा गंधर्व शापित होता. पण शापित असला तरी तो गंधर्व होता...आणि म्हणूनच तो गेला...आणि तोही अगदी मनाला चटका लावूनच !
मायकल जॅक्सन हे एक वादळ होतं...आणि आता हे वादळ ओसरलयं इतकचं.

Friday, June 19, 2009

जिहाल ए मस्ती...

अनेक दिवसांनी आज मनसोक्त संगीत ऐकावसं वाटलं...आणि सगळी कामे सोडून ते ऐकलं.
संगीतात किती ताकद आहे, मूळात भारतीय संगीत, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, अभिजात, सुगम, लोकसंगीत किंवा अन्य किती म्हणून व्हरायटी आहे त्यात.
भारतातल्या भाषा, त्या भाषांचा लहेजा, त्याला मिळालेली स्वरांची अन् सुरांची साथ...विलक्षण सौंदर्याचे आविष्कारचं या सा-यातून जन्माला येतात.
गुलाम अलीची 'ये दिल ये पागल दिल मेरा'...असंख्य वेळा ऐकूनही मनाची तृप्ती अशी होतच नाही.
त्यातील एक अंतरा...
'अब मै समझा तेरे रुक्सार पे तील का मतलब
दौलत-ए-हुस्न पे दरबान बिठा रख्खा है'...
शब्द, स्वर, गायकी, सुर सारं काही अगदी विलक्षण....गुलाम अली, ज्याचे साक्षात स्वर गुलाम आहेत, असे गायक. गझलमधील शब्दांचा सुरांच्या मदतीने प्रत्येक रेशीम पदर उलगडवून दाखवणारा एक समृद्ध गायक...
म्युझिक थेरपी हा प्रकार मला फारसा माहित नाही, पण ही थेरपी जर खरी असेल तर निश्चित संगीतामुळे माणसाच्या अनेक समस्या लीलया सुटू शकतील...
फार लिहायचयं, पण सध्या इतकचं.

Thursday, March 19, 2009

आनंदाचे डोही 'आनंद' तरंग(ले)!

आनंद यादव यांनी नियोजित साहित्य संमेलनाचा राजीनामा दिला. राजीनामा द्यावा लागला हेच खरे. हा विजय वारक-यांचा कि आनंद यादव यांच्या सारासार विचारबुद्धीचा. सारासार विचारबुद्धी हा शब्द प्रयोग अशासाठी केला आहे की, साहित्य संमेलनाला महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाकडून साहित्य संमेलनाला गालबोट लागू नये म्हणून दिला असावा, या अर्थी वापरला आहे.
संतपरंपरेचा वारसा लाभलेल्या या वारक-यांनी असा वार करावा हेच कोणत्याही सुजाण व्यक्तीच्या वर्मी लागण्यासारखे आहे. पण वारक-यांनी हे केले. झाले ते योग्य की वाईट याची चर्चा करण्यापेक्षा हे असे का झाले ? याचा विचार करण्यात मन गुंतले आहे.
वारक-यांची सतसतबुद्धी लोप पावत चालली आहे का, अशी क्षणभर शंका यामुळे आली. अभिव्यक्तीस्वातंत्र्यांची गळचेपी, आणि ती ही क्षमाशील आणि उदात्ततेचा वारसा लाभलेल्या वारक-यांकडून व्हावी हे दुर्देव आहे.
या मागे त्यांचा काही हेतू आहे की आता वारकरी हे वारकरी न राहता त्यांच्यातही झुंडशाही प्रवृत्तीचा अंतर्भाव झाला आहे, आणि आनंद यादव यांचा राजीनामा हे या झुंडशाही प्रवृत्तीने केलेले शक्तीप्रदर्शन आहे असा प्रश्न या निमित्ताने पडतो...
ही घटना खचितच व्यथित करणारी आहे.
तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे...
''आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू''...
वाकर-यांनी या प्रकरणी निषेधासाठी शब्दांची शस्त्रे केली असती तर केवळ लोकशाहीसाठी नाही तर त्यांच्या परंपरेचा आणखी एक प्रत्यय पुन्हा एकदा उभ्या महाराष्ट्रानं अनुभवला असता.