Sunday, September 19, 2010
गणपती बाप्पा मोरया !!!
नेहमीप्रमाणे वाजतगाजत गणपती आले. गेल्या काही वर्षांत, विशेषतः जेव्हापासून माझ्या जाणीवा आणि संवेदना अधिक तीव्र झाल्या तेव्हापासून मी दरवर्षी गणपती आलेला पाहतो. दहा दिवस थांबतो आणि विसर्जन...पुन्हा पुढल्यावर्षी आहेच...माझ्या आयुष्यात गणपती येण्याने आणि त्याच्या दहा दिवस थांबण्याने काय फरक पडतो, याचा मी यंदा विचार केला...विचारांची ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. आतापर्यंत काहीच विशेष फरक पडल्याचे जाणवले नाही. कदाचित संस्कृतीरक्षक मला असं सांगून समजाविण्याचा प्रयत्न करतील, की लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनासाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी या उत्सवाची सुरुवात केली वगैरे...ओके. मानलं. पण आता काय?आता याचा वापर केवळ राजकीय शक्तीप्रदर्शनासाठीच होतो, आणि काही जणांसाठी गणपती हे अर्थाजनाचं साधन आहे. या पलीकडे गणपतीचं महत्त्व काय?लालबागचा राजा...माझ्यामते केवळ मीडियानं मोठा केलेला गणपती.बारकाईन विचार केल्यावर आणि पाहिल्यावर अनेक गोष्टी मला अस्वस्थ करून गेल्या. ज्या दिवशी गणपती आले त्यावेळी मिरवणुकीला ढोल-ताशाच्या तालावर अनेक मुलं नाचत होती. स्पष्ट सांगायचे तर बहुजन समाजातील. आणि त्यांच्या मागे सवर्ण घरातील मुंल हातात गणपती घेऊन...हीच ती बहुजन समाजातील मुलं दहा दिवस रात्रभर जागून गणपती साजरा करतात. त्यांचा त्या गणपतीशी तेवढाच काय तो संबंध. आणि सवर्ण घरातील मुलं सकाळ-संध्याकाळ आरती आणि मग अभ्यास. आज असलेलं हे चित्र 25 वर्षांनी काही वेगळं नसेल. याचं कारण म्हणजे आज गणपतीच्या पुढ्यात नाचणारी ही मुलं 25 वर्षांनी त्यांच्या मागे म्हणजे गणपती घेऊन किंवा आरती करून अभ्यास करालया बसलेल्या मुलांच्या गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून काम करणार. गणपतीत पुन्हा दहा दिवस नाचगाणी करणार, रात्री जागविणार. आणि त्यांचे मालक आपल्या मुलाकडून आरती करून घेऊन त्याला अभ्यासाला बसविणार...जागतिकीकरणाच्या आणि अणुकराराचा झेंडा मिरवणा-या देशात विषमतेचे यापेक्षा जळजळीत उदाहरण आणखी काय हवे...सुजाण माणसं म्हणतील की हे खरयं किंवा खोटंय किंवा अतिरेकी आहे. ..पण हे वास्तव आहे...आपल्यासारख्या लबाड झालेल्या लोकांनी (सभ्यपणाच्या बुरख्याआड संवेदना लपविलेल्या लोकांनी) हे वास्तव नाकारायचं असं ठरवलं आहे !!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
मला मुंबईतील गणेशोत्सवाबद्दल फारसं माहिती नाही. पण पुण्यातील गणेशोत्सवाबद्दल मी १०० टक्के ठामपणे बोलू शकतो की, सवर्ण किंवा बहुजन असला मतभेद तिकडे नाही. सर्व जण एकदिलाने काम करतात आणि एखादाच समाज पालखी वाहतो आणि दुसरे फक्त कष्ट करतात, असे तिथे नाही.
बाकी लालबागच्या राजाबद्दल तुझे मत आहे तेच माझेही मत आहे. गणपती मंडळे ही राजकीय कार्यकर्त्यांची पाठशाळा आहे, असं माझं मत आहे. पुण्याबद्दल मी हे ठामपणे सांगू शकतो. ही मंडळे राजकीय मंडळींनी हायजॅक केली आहेत, हे मुंबईत जरी खरं असले तरी पुण्यात गणपती मंडळात सगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते असतात आणि निवडणुकीतही त्यांच्यात वितुष्ट नसते.
आशिष चांदोरकर
Post a Comment