Monday, March 15, 2010

गंमतजंमत दुबईतल्या साहित्य संमेलनाची

दुसरे मराठी विश्व साहित्य संमेलन गाजले ते विविध कारणांनी. वाद, मराठीसाठी आवश्यक आणि अपेक्षित असलेल्या पण न झालेल्या चर्चा, झालेली गॉसिप्स, स्वागताध्यक्षांची घुसखोरी, आयोजकांची तारांबळ, आणि बरंच काही...या विश्वसाहित्य संमलेनाला चक्क एक मराठी रँचोही गेला होता...रँचोच्या कॅमे-यात टिपली गेलेली ही काही क्षणचित्र...

चकटफू टूर आणि मराठी पत्रकार !

विश्व मराठी साहित्य संमलेन...तेही दुबईत...आणि तमाम पत्रकारांना आमंत्रण (म्हणजे चकटफू ट्रीप) हा म्हणजे दुग्धशर्करा योगच ! त्यामुळे मुंबईतून सकाळी नऊ वाजता जाणा-या विमानाला अपेक्षित रिपोर्टींग टाईम सकाळी सहा असला तरी पत्रकारांनी पहाटे पाचपासूनच विमानतळावर गर्दी केली होती.
मजल-दरमजल करत अखेर विमानात आसनस्थ झाल्यानंतर दुबई येईपर्यंत एक छोटीशी झोप झाली...मग दुबईत पाय ठेवताच सगळे एकदम फ्रेश...
सर्वसाधारणपणे 16 ते 18 तास प्रवास केल्यानंतर जेटलॅग येतो असं आजवर ऐकलेलं...पण दुबईची वेळ भारताच्या दीडच तास मागे असली तरी हॉटेलवर पोहोचल्यावर काही पत्रपंडितांमध्ये जेटलॅग आल्याची चर्चा होती...असो !
स्वागताध्यक्ष धनंजय दातार यांनी स्वागत केल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली. संमलेनाची तयारी, आलेले साहित्यिक किंवा कार्यक्रमपत्रिका याच्यावर साधारणपणे प्रश्नोत्तरे होणे अपेक्षित होते...मात्र दुबईत आल्यानंतर मनात जे प्रश्न पडावे त्यांचे निरसन या पत्रकार परिषदेत अगदी यथासांग झाला. मग सिटी टूर...
टूर निघाली दुबई दर्शनाला...मनभरून दुबई पाहताना काहींनी आपण यापूर्वी गेलेल्या जंकेटमध्ये काय केले याचे अनुभव शेअर करतानाच तसेच प्लॅन्स या टूरमध्येही कसे आखता येतील या कल्पनांचे व्हर्च्युअल प्रेझेंटेशन झाले. मग काय पुढचे चार दिवस जीवाची झाली दुबई !

‘मान’ पत्रकारांचा ‘धन’ दातारांचे ?

विश्व साहित्य संमेलन कव्हर करायला खासा वेळ काढून दुबईला पोहोचलेल्या पत्रकारांचा यथोचित मान झाला नसता तर केवढा अपमान झाला असता ? चाणाक्ष दातारांना याची पूर्ण कल्पना असल्यानेच त्यांनी मग थेट डिलिंगचा विषय काढला, अशी चर्चा शेवटच्या दिवशी ऐकायला मिळाली. पत्रकारांना काय देऊन सन्मानित करावे, असा प्रश्नाचा चेंडू ‘दाता’रांनी ‘ज्येष्ठ आणि अनुभवी’ पत्रकारांच्या कोर्टात टाकला. अगदी सफाईने हा चेंडू टोलवताना फार काही नाही, पाचशे दिराम दिले तरी चालतील, लोकांना हवे ते घेता येईल, अशी एक सोयीची सूचना आल्याचे कळते. मग काय ज्या डिनर पार्टीत ही चर्चा झाली, तिथल्या काही पत्रकारांना याची कुणकुण लागल्याने त्यांनी याला विरोध होऊ शकतो, वगैरे भूमिका घेतली. त्या डिनर पार्टीनंतर दातारांनी काही ज्येष्ठ पत्रकारांची परिषद घेतली. ब्लॅक लेबलच्या साक्षीने झालेल्या या परिषदेत काही निर्णय झाला. या निर्णयाची खबर कुणालाही लागली नाही. मात्र या निर्णयाला उलगडा त्याच्या पुढच्या दिवशी रात्री झाला. 27 पत्रकारांपैकी 9 पत्रकारांना दिवाण-ए-खासमध्ये मेजवानीचे निमंत्रण मिळाले. तर 18 पत्रकार दिवाण-ए-आममध्ये जेवले. नऊ पत्रकारांच्या या नवलाईची बातमी कळताच 18 जण आंदोलनाच्या पावित्र्यात आले. मग असे कळले की, 500 दिराम संकल्पनेच्या विरोधामुळे पत्रकारांची एकजूट फुटली. अशीही चर्चा नंतर ऐकायला मिळाली की, ठरलेले 27 गुणिले 500 दिरामचे समीकरण 27 गुणिले 500 दिराम भागिले 9 अशा सूत्राने सोडवण्यात आले....मात्र हे सर्व कळते-समजते !

घोळाचे संमेलन...(दिवस पहिला)

किमान दुबईत स्थायिक असलेल्या भारतीयांकडून तरी वेळ पाळली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र भारतातून दुबईत दाखल झालेल्या मंडळींना अजिबात आपण परदेशात आहोत हे फिलींग न देण्याचाच जणू आयोजकांचा हेतू होता. त्यामुळे सायंकाळी सहा वाजता उदघाटन नियोजित असले तरी प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू व्हायला रात्रीचे आठ वाजले. त्यात महाराष्ट्रातून गेलेल्या मंत्र्यांनी भाषणासाठी राखून ठेवलेल्या दहा मिनिटांऐवजी तब्बल 20-20 मिनिटे खाल्याने आणि एकूणच संमलेनाध्यक्ष मंगेश पाडगावकर यांच्यासमोर आपली प्रतिभा दाखवण्यासाठी उत्सुक लोकांनी हातात माईक आल्यावर शक्य तितकावेळ आपल्याकडेच माईक राहील, अशा पद्धतीने भाषणे केल्याने कार्यक्रमपत्रिकेवरील वेळ आणि प्रत्यक्षातील वेळ यात बरेच अंतर पडले.
“...आठ वक्ते बोलल्यावर काही बोलू नये ” या आपल्याच कविवतेतील ओळींनी सुरुवात करत पाडगावकरांनी त्यांच्यासकट बोअर झालेल्या लोकांची व्यथा कवितेच्या माध्यमातून मोकळी केली. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या झालेल्या गळचेपीचा चांगलाच समाचार आपल्या भाषणातून घेतला. कोणताही झेंडा हाती न घेता लिखाण करण्याच आवाहन करत जोरजबरदस्ती करणा-यांना आव्हान दिले !
कार्यक्रमपत्रिकेनुसार उदघाटन सोहळ्यानंतर मंगेश पाडगावकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आता संमेलनाध्यक्षांनी उदघाटनाचे भाषण केल्यानंतर स्वाभाविकपणे पत्रकारांनी मीडिया सेंटरच्या दिशेने धाव घेत बातमी देण्यासाठी पळापळ सुरू केली. 27 पत्रकार आणि चार संगणक...मग काय आयोजकांबरोबर अक्षरशः बा..चा...बा...ची !
एकिकडे पत्रकारांचा घोळ सुरू असताना दुसरीकडे रात्री उशिरा साडे अकरावाजताच्या दरम्यान पाडगावकरांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झाला...एरवी पाडगावकरांची मुलाखत म्हटली की महाराष्ट्रात पाच-सहाशे लोकांची गर्दी तर अगदी सहज...पण दुबईत पाडगावकरांच्या मुलाखतीला स्वतः पाडगावकर, दोन मुलाखतकार यांच्यासह केवळ 20 लोक ऑडिटोरियममध्ये उपस्थित होती....
रँचोसकट सगळ्यांचे पेशन्स संपले होते....आणि मग तरीही ‘ ... या जगण्यावर शतदा प्रेम करावे ’ या पाडगावकरांच्याच कवितेतील ओळी गुणगुणत अखेर रात्री साडेबाराच्या दरम्यान टूरिस्ट साहित्यप्रेमी पुन्हा हॉटेलवर पोहोचली...
...सगळ्यांची एकदम बॅटरी डाऊन...(काहींनी मद्याच्या सहाय्याने चार्जिंग केलेही पण वेळेअभावी बॅटरी फूल झाली नाही !)

(दिवस दुसरा)

दुबईत एक लोच्या आहे..कसलंही जाहीर प्रदर्शन करता येत नाही. त्यामुळे मग ग्रंथदिंडीही निघाली तरी संमलेन ज्या ऑडिटोरियममध्ये होते त्या हॉलमध्येच...पण चांगली झाली ग्रंथ दिडी...
दुस-या दिवशी भोजनापर्यंतचे कार्यक्रम तरी सुरळीत सुरू होते...दुपारच्या जेवणानंतर मात्र ख-या अर्थाने संमेलन सुरू झाले. म्हणजे वादाची ठिणगी पडली. निमित्त होते नृत्यांगना रंजना फडके यांना निमंत्रण देऊनही कार्यक्रमाचे सादरीकरण न करू दिल्याचे. संमेलनादरम्यान रंजना फडके यांच्या नृत्याविष्काराचा कार्यक्रम दररोज आयोजित करण्यात आला होता. मात्र पहिले दोन्ही दिवस त्यांना अजिबात नृत्य सादर करण्याची संधी आयोजकांनी दिली नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा अपमान झाला. नेमका हाच धागा दातारांनी पकडला. धनंजय दातार यांनी हा विषय चांगलाच लावून धरला आणि दुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा संजीवनी पाटील आणि अखिल भारतीय मराठी साहित्यमहामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यावर मीडियाच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले.
रात्री दातार यांनी मीडिया प्रतिनिधींना दिलेल्या विशेष पंचतारांकित पार्टीत तर आपण काय आणि कसे कॉन्ट्रॅक्ट दुबई महाराष्ट्र मंडळाबरोबर केले त्याच्या फोटोकॉपीच वाटल्या. रँचोचे कान टवकारले...मग काय बातमी मागची बातमी काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. साधारणपणे पाच पेग पोटात गेल्यानंतर अनोळखी व्यक्तीबाबत जी आत्मियता निर्माण होते, त्या आत्मियतेने मग दुबईस्थित मंडळींनी माहिती दिली. ती अशी की “मूळात स्वागताध्यक्ष दातार यांचा या संमलेनाशी काही संबंध नाही...त्यांचा तसा संबंध तर दुबई महाराष्ट्र मंडळाशीही नाही...पण या संमलेनाच्या निमित्ताने प्रसिद्धी अगदी सहज होईल हे दातारांसारख्या चाणाक्ष उद्योजकाच्या लक्षात आल्याने त्यांनी ही संधी साधली. मूळात या संमेलनाचे आयोजनकर्ते होते दुबई महाराष्ट्र मंडळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ. त्यामुळे मग या संमलेनाचा सर्व खर्च करण्यासाठी प्रायोजकत्व देत दातारांनी स्वागताध्यक्ष पद मिळवले. पण महामंडळातली मंडळी असे अनेक कार्यक्रम कोळून प्यायलेली असल्याने त्यांनी दातारांना महत्त्वच न देत आपला अजेंडा राबवायला सुरूवात केल्याने मग वादाची ठिगणी पडली...’’ (ही सर्व माहिती कळते समजते या सदरात मोडते. पण...)

दिवस तिसरा आणि ‘लाख’मोलाचा अपमान

रात्री झालेल्या वादाच्या मोठ्या बातम्या सर्वत्र झळकल्यावर, चला मसाला मिळणार म्हणून सगळ्याच पत्रकारांच्या आशा पल्लवित झाल्या. साहित्य संमेलनाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वजण हॉटेलच्या लॉबीत जमा झाले तोच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण रात्री ज्यांच्यात वाद झाला होता ते धनयंज दातार, दुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा संजीवनी पाटील आणि मिस्टर कौतिकराव ठाले-पाटील हेच लॉबीत हजर. हे इकडे कसे असे भाव सर्वांच्याच चेह-यावर होते. मग दातारांनीच खुलासा केला की आमच्यातील वाद मिटलेत आणि आम्ही रंजना फडके यांची मनधरणी करण्यासाठी इथे आलो आहोत. एवढा खुलासा करून दातार, संजीवनी पाटील आणि कौतिकराव ठाले-पाटील रंजना फडके यांच्या मनधरणीसाठी त्यांच्या रूममध्ये गेले. आणि येताना त्यांना घेऊनच खाली आले. रंजना फडके यांचा अपमान झाल्यानंतर त्यांना अखेर नृत्याची संधी तर दिलीच, पण एक लाख एक हजार रुपयांचे मानधन देत दातारांनी अपमान भरपाई करण्याचा प्रयत्न केला.
सर्व सुरळीत झाले म्हणून मग पत्रकारांमध्येही पुन्हा दुबई दर्शनाची चर्चा सुरू झाली आणि तेवढ्यात कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले की, मी रंजना फडके यांची मनधरणी केलीच नाही. कार्यक्रमात आवश्यक ते बदल मी केले...पण मला दुबईत येईपर्यंत कार्यक्रम पत्रिकाच माहित नव्हती...कौतिकराव ठाले-पाटील यांनी एकेक्या वाक्यामागे एकेक ब्रेकिंग न्यूज दिल्याने पुन्हा एक नवा उत्साह संचारला. आणि मग मराठी पापाराझ्झींनी आपल्या बसमधून सुरू केला दातारांच्या रोल्स रॉईस गाडीचा पाठलाग !

संमलेनाच्या ठिकाणी पोहोचल्यावर दारातच मग पुन्हा एकदा ठाले-पाटील आणि पत्रकार यांची ‘खडा’जंगी झाली. ठाले-पाटील यांनी मग तुम्हाला ज्या पटट्या चालवायच्या त्या चालवा...ज्या बातम्या लावायच्या ते लावा...तुमच्यामुळेच हे वाद पेटलेत, असे सांगत सराईतपणे मीडियावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला.
विझलेल्या ठिणगीतून पुन्हा वणवा पेटल्याने दातारांनीही मग ठाले-पाटलांना फक्त आपल्या रोल्सरॉईसमधून फिरण्यात इंटरेस्ट होता असे सांगत टीकास्त्र सोडले...
...असे कसेबसे साहित्य संमलेनाचे सूप वाजले !

...एवढ्या सर्व हॅपनिगंमध्ये पाडगावकर मात्र दुर्लक्षितच होते. तसेच शोधमोहिम घेतल्यावर लक्षात आले की, अरेच्चा विश्व साहित्य संमलेन म्हणून होणा-या या कार्यक्रमात पाडगावकर वगळले तर कुणीच साहित्यिक नाहीत...

...दुस-या विश्व साहित्य संमेलनातून काय हाती लागले, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. (तसे हे संशोधन प्रत्येकच संमलेनाअंती होऊ शकते !) असो...पण चमकेश लोक चमकले, आयोजक गोंधळले, आणि पत्रपंडितांच्या जीवाची दुबई झाली...थोडक्यात काय तर ‘ALL WAS WELL’


No comments: