आनंद यादव यांनी नियोजित साहित्य संमेलनाचा राजीनामा दिला. राजीनामा द्यावा लागला हेच खरे. हा विजय वारक-यांचा कि आनंद यादव यांच्या सारासार विचारबुद्धीचा. सारासार विचारबुद्धी हा शब्द प्रयोग अशासाठी केला आहे की, साहित्य संमेलनाला महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाकडून साहित्य संमेलनाला गालबोट लागू नये म्हणून दिला असावा, या अर्थी वापरला आहे.
संतपरंपरेचा वारसा लाभलेल्या या वारक-यांनी असा वार करावा हेच कोणत्याही सुजाण व्यक्तीच्या वर्मी लागण्यासारखे आहे. पण वारक-यांनी हे केले. झाले ते योग्य की वाईट याची चर्चा करण्यापेक्षा हे असे का झाले ? याचा विचार करण्यात मन गुंतले आहे.
वारक-यांची सतसतबुद्धी लोप पावत चालली आहे का, अशी क्षणभर शंका यामुळे आली. अभिव्यक्तीस्वातंत्र्यांची गळचेपी, आणि ती ही क्षमाशील आणि उदात्ततेचा वारसा लाभलेल्या वारक-यांकडून व्हावी हे दुर्देव आहे.
या मागे त्यांचा काही हेतू आहे की आता वारकरी हे वारकरी न राहता त्यांच्यातही झुंडशाही प्रवृत्तीचा अंतर्भाव झाला आहे, आणि आनंद यादव यांचा राजीनामा हे या झुंडशाही प्रवृत्तीने केलेले शक्तीप्रदर्शन आहे असा प्रश्न या निमित्ताने पडतो...
ही घटना खचितच व्यथित करणारी आहे.
तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे...
''आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू''...
वाकर-यांनी या प्रकरणी निषेधासाठी शब्दांची शस्त्रे केली असती तर केवळ लोकशाहीसाठी नाही तर त्यांच्या परंपरेचा आणखी एक प्रत्यय पुन्हा एकदा उभ्या महाराष्ट्रानं अनुभवला असता.