मित्र हो,
'आपले छंद' या नावाच्या पुणे येथून प्रकाशित होणा-या दिवाळी अंकात यंदा '100 वर्षांनंतरचा भारत' या विषयावर आधारित लेखमाला प्रकाशित झाली. या लेखमालेत '100 वर्षांनंतरचा भारतीय उद्योग' या विषयावर मला लेख लिहिण्यास सांगितला होता. तो लेख संबंधित दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे. पण आपल्यापर्यंत जर तो दिवाळी अंक पोहोचला नसेल, तर आपल्याशी चर्चा करण्यासाठी तो लेख मी या ब्लॉगवर टाकत आहे. लेखाचे आकारमान मोठे आहे, त्यामुळे जमेल तेव्हा वाचा, आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.
-----------------------------------------------------
'महासत्तेच्या महामार्गावर भारत...'
गेल्या 100 वर्षांत भारतात कार्यरत असलेल्या दोन ते तीन उद्योगपतींची नावं सांगा असं जर आपल्याला कुणी विचारलं तर पटकन नावं आठवतील ती टाटा, बिर्ला आणि 1960 च्या दशकानंतर अंबानी यांची. आणि नेमका भूतकाळाऐवजी भविष्यकाळाबाबत हाच प्रश्न जर आपल्याला विचारला तरी आपल्याला तोंडावर पहिली तीन नावं येतील ती टाटा, बिर्ला, अंबानी यांचीच. एकाअर्थी या उद्योगांचं हे यश आहे. पण दुसरीकडे विचार केला तर आपल्या लक्षात येईल, की या उद्योगांनी गतकाळात आपल्या उद्योगाची पाळंमुळं तेव्हाच रोवली आहेत. या लोकांनी केवळ स्वतःच्या पिढीच्या चरितार्थ उद्योग निर्माण न करता उद्योजकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं शैक्षणिक संस्था, लघु-उद्योग प्रशिक्षण संस्थांची निर्मिती केली. म्हटलं तर आज या उद्योजकांनी लावलेल्या रोपट्यांना आता कुठे पालवी फुटत आहे, येत्या 100 वर्षांत यांची फळंही त्या उद्योजकांच्या वारसांना आणि त्या उद्योगावर पोट अवलंबून असलेल्या कोट्यवधी लोकांना चाखायला मिळणार आहेत.
1991 पर्यंत असलेला भारतीय उद्योगाचा चेहरा आणि आज भारतीय उद्योगजगताचा महासत्तेकडे होत असलेला प्रवास…गेल्या सतरा वर्षांताली दोन महत्त्वपूर्ण स्थित्यंतर. ‘थँक्स टू द रिव्होल्यूशन ऑफ ग्लोबलायझेशन’. ही आणि हीच भावना आजच्या घडीला भारतीय उद्योगाची आहे. खरंतरं 1947 पूर्वीच भारतातील उद्योजकतेला सुरुवात झाली होती. 1991 पर्यंत असलेल्या लायसन्स राजमुळं या उद्योगांचे बोन्साय होते की काय अशी शंकाही यायला लागली. पण 1991 ला भारतानं जागतिकीकरणाचं धोरणं अवलंबलं आणि बघता बघता आज आपण अमाप संधींच्या एका विषुववृत्तावर उभे ठाकत नवी क्षितीजे जिंकण्यांची स्वप्नं रेखाटत आहोत. त्यामुळेच मग ही स्वप्नंपूर्ती करायची, आणि स्वप्नांच्याही पलीकडे जात जर काही असेल तर ते साध्य करायचे, अशी महत्त्वाकांक्षा उराशी बाळगत आज भारतीय उद्योगाच्या सर्वच स्तरातील व्यावसायिक ईर्षेला पेटून काम करताना दिसत आहेत.
येत्या 100 वर्षांत नेमका भारतीय उद्योग कुठे आणि कसा असेल याचा सखोल विचार करायचा झाला तर, आपल्याला सध्या भारतीय उद्योग जगतात सुरू असलेल्या घडामोडी आणि त्यांच्यामार्फत सुरू असलेल्या भविष्यवेधी गुंतवणुकीचा वेध घ्यावा लागेल. आजच्या घडीला जगभरात संगणकाचं महत्त्व आणि वापर अविभाज्य झाला आहे. अंमेरिकेसाऱख्या महाकाय देशानं यात क्रांती केली, पण संगणक नावाच्या हार्डवेअरमध्ये जीव फुंकला तो भारतीय सॉफ्टवेअर सम्राटांनी. या लेखाच्या निमित्तानं आगामी 100 वर्षांत भारतीय उद्योगाचा चेहरा नेमका कसा असेल, भारतीय उद्योग कुठे आणि कसा असेल अशा अनेक बाबींचा परामर्श घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.
वर नमूद केल्याप्रमाणे 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेने आणि पर्यायाने उद्योगाने कात टाकण्यास सुरुवात केली. सध्या भारतीय उद्योगात असलेले प्रचलित उद्योग आणि त्यात होत असलेल्या घडामोडी लक्षात घेऊन आगामी 100 वर्षांचा आढावा घ्यावा लागेल. सुरुवातीला आपण वेध घेऊया माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राचा. आज भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाचं महत्त्व जागतिक पटलावर वादातीत आहे. सध्या भारतात संगणक, सॉफ्टवेअर आणि संगणकाच्या आधारावर विकसित झालेले तंत्रज्ञान यामुळे निर्विवादपणे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान उद्योग 61 अब्ज अमेरिकी डॉलरच्या घरात आहे. माहितीसेवा क्षेत्राच्या अनुषंगाने सेवा क्षेत्राचा विकास झाला आहे. आजच्या घडीला देशाच्या विकासदरात 58 टक्के वाटा हा सेवाक्षेत्रातून मिळणा-या महसूलाचा आहे. त्यामुळे आज भारतात जे नव्याने येणारे उद्योग आहेत, ते एकतर थेट माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत, किंवा त्याच्या अनुषंगाने निर्माण झालेले उद्योग आहेत. यात टेलिकॉम, बीपीओ, आयटीईएस अशा अनेक क्षेत्रांचा विचार करता येईल. या उद्योगांचा विकासदर घसघशीत आहे. मात्र तरीही या क्षेत्रात जर आपला दबदबा जर कायम ठेवायचा असेल, तर त्यात काही भरीव आणि ठोस अशा सुधारणा करण्याची गरज आहे. ‘नॅसकॉम’ या भारतीय आयटी उद्योगाच्या प्रमुख संस्थेचे अध्यक्ष किरण कर्णिक यांच्यामते सध्या आपण ‘सॉफ्टवेअर कुली’चे काम करत आहोत. याचा अर्थ असा की, ग्राहकाने त्याच्या गरजांनुसार सांगितलेली सॉफ्टवेअर्स निर्माण करत आहोत. मात्र आपल्याला जर या क्षेत्रात आपला दबदबा ठेवायया असेल तर ‘डोमेन कन्स्लटन्सी’सारख्या विषयांत उतरणे गरजेचे आहे. आपण निश्चिच असा धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला तर जग आपल्याकडून सॉफ्टवेअर्स घेईल. जागतिक कंपन्यांमध्ये काय सॉ़फ्टवेअर्स असतील, याची रचना आणि मार्केटिंग आपण केले पाहिजे. कर्णिक यांनी मांडलेले मत कालौघात प्रत्यक्षात येईलही, पण तरीही सध्या 61 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर असलेला हा उद्योग 100 वर्षांत सध्याच्या उलाढालीच्या किमान 500 पट पुढे असेल, यात शंका नाही. माहिती तंत्रज्ञानाचा परिसस्पर्श आजच्या घडीला सर्वच क्षेत्रातील कंपन्यांना झाल्याने त्यांच्या उद्योगात लक्षणीय प्रगती झाल्याचे चित्र पाहायला मिळते. जसजसे माहिती तंत्रनानाचे क्षेत्र उत्क्रांतीचे नवनवे टप्पे गाठेल, तसतसा त्याचा आणखी व्यापक स्वरूपातील फायदा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला आणि पर्यायाने ते ज्या कंपन्यांसाठी काम करत आहेत, त्यांना झालेला दिसेल.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हेच सर्व क्षेत्रांचा भविष्यात आत्मा असेल. पण आता सध्या जे उद्योग आणि जी उद्योगघराणी देशात कार्यरत आहेत, त्यांचा बारकाईने विचार केला तर 100 वर्षांनतरच्या भारतीय उद्योगाचे चित्र रेखाटण्यात काही प्रमाणात मदत होईल. सध्या भारतीय उद्योगात मानाचे स्थान टिकवलेले उद्योगपती म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी. अर्थात उद्योगपती अनेक आहेत, पण ज्यांच्या उद्योगाच्या महसुलाची बरोबरी थेट देशाच्या अर्थसंकल्पाशी करता येईल, असे उद्योगपती हे फक्त हे तीनच आहेत. या उद्योग घराण्यांचा विचार करताना सर्वप्रथम आपण टाटा समूहाबाबत थोडासा विचार करू. सर जमशेदजी टाटा या ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्वाने केवळ टाटा समुह नावाने उद्योग सुरू केला नाही, तर भारतीय उद्योगाचा पाया रोवला. उद्योग करू इच्छिणा-या अन्य लोकांच्या मनात आत्मविश्वासाचे बीज पेरले. सुरुवातील पोलाद उद्योगात असलेल्या टाटा समुहाने गेल्या काही वर्षांत काळाची पावले वेळीच ओळखत आपल्या उद्योगांची व्याप्ती वाढविली. यात मग टाटा मोटर्सच्या माध्यमातून निर्मिती होणा-या गाड्या असोत, दूरसंचार क्षेत्रात झालेल्या क्रांतीनंतर आलेला टाटाचा मोबाईल असेल, हॉटेल उद्योग असेल किंवा गुंतवणूक क्षेत्र असेल, अशा सर्वच ठिकाणी टाटांचे नाव आजच्या घडीला अग्रकमात येते. ‘विश्वास’ या शब्दाशी समानार्थी ठरलेल्या टाटा सुमहाने वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांत तर विकास केलाच, पण याचबरोबच नॅनो टेक्नॉल़ॉजी, सॅटेलाईट टेलिव्हिजन अशा भविष्यवेधी क्षेत्रातही शिरकाव केला आहे. टाटा समुहाचे सध्याचे (अ) कार्यकारी अध्यक्ष रतन टाटा यांनी ख-या अर्थानं टाटा समुहाचे नाव जागतिक पटलावर उंचावले. त्यांनी अलीकडच्या काळात खरेदी केलेल्य दिग्गज आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यवहारांवर नजर टाकली तर ही बाब निश्चितच अधोरेखित होते. टाटा समुहासमोर आजच्या घडीला एक प्रश्न आहे रतन टाटा यांच्या उत्तराधिका-याचा. पण सर जमशेदजी टाटा, जे.आर.डी टाटा, रतन टाटा अशा दिग्गजांनी ज्या पद्धतीने आपल्या उद्योगाची मूळं रोवलेली आहेत कि या वटवृक्षाला वारस मिळो न मिळो, पण त्यांचा डोलारा कधीच कोसळणार नाही, हे मात्र नक्की. व्यवस्थापन विषयातील प्रसिद्ध लेखक आर्चिस डिमॅलो यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखानुसार, ‘’टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे आश्वासन आणि टाटा म्हणजे भारतीय माणसाला उद्योजकतेच बाळकडू देणारे लोकं. भविष्यात टाटा यांच्या कुटुंबातील कुणी त्या उद्योगाची धुरा सांभाळायला असो वा नसो, टाटा या केवळ नावावर या उद्योगाची भरभराट अशीच होत राहणार आहे. भविष्यात टाटा समूह आजच्यापेक्षा किमान 200 टक्क्यांची वृद्धी नोंदवेल.‘’ विश्वासाशी एकरूप झालेला टाटा समुह देशात नाही तर जगात भारताचे नाव अग्रक्रमाने घ्यायला भाग पाडेल, असे त्या उद्योगात सुरू असलेल्या घडामोडींवरून स्पष्ट होते.
हे झाले टाटा समूहाबद्दल. आता वेध घेऊया सध्या तरूण पिढिचे आयकॉन म्हणता येईल, अशा अंबानी बंधूंच्या ‘रिलायन्स’वर. 1960 च्या दशकांत धीरूभाई अंबानी नावाचे एक वादळ गुजरातेतून मुंबईत आले. आणि पाहता पाहता ‘ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले’, अशी उक्ती त्यांनी खरी ठरविली. बँका कर्ज देत नाहीत, हा अनुभव घेतल्यावर धीरूभाई यांनी विश्वासाची फुंकर घालत थेट लोकांच्या खिशात हात घातला, स्वतःबरोबर कोट्यवधी लोकांना श्रीमंतीचा अनुभव दिला. सुरुवातीला पॉलिएस्टर आणि अन्य काही उद्योग केलेल्या रिलायन्स उद्योगात जेव्हा धीरूभाई यांना त्यांचे पुत्र मुकेश आणि अनिल अंबानी यांची साथ लाभली तेव्हा त्यांनी अक्षरशः ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे’ अशा पद्धतीने विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतला. धीरूभाई यांच्या निधनानंतर काही वर्षांतच मुकेश आणि अनिल या दोन्ही भावांत उद्योगाचे विभाजन झाले, हे सर्वश्रुत आहे. मात्र या विभाजनावर जर बाकराईने नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल, की या दोन्ही भावांकडे ज्या कंपन्या आहेत, त्यातील प्रत्येक कंपनी आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित वस्तू अथवा गरजेशी संबंधित आहे. यात नॅचरल रिसोर्सेस, ऊर्जा, दूरसंचार, भांडवील बाजारातील कंपन्या, पॉलिएस्टर, विशेष आर्थिक क्षेत्र अशा अनेक उद्योगांचा समावेश आहे. अनिल अबांनी यांच्या तुलनेत मुकेश अबांनी याची प्रतिमा आज ‘हार्डकोअर बिझनेसमन’ अशी आहे. मुकेश अबांनी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिज या उद्योग वर्षाकाठी एक लाख कोटींच्याही वर आहे. मुकेश अंबानी यांनी या उद्योगांबरोबरच थेट सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी रिलायन्स फ्रेश आणि रिलायन्स रिटेल, असे नवे उद्योगही सुरू केले आहेत. येत्या काही वर्षांत रिटेल क्षेत्रात जागितक पातळीवर दादा कंपनी असलेली ‘वॉलमार्ट’ भारतात येत आहे. आपल्या देशात सध्या रिटेल उद्योगाची जेवढी वर्षाकाठी उलाढाल आहे, तेवढी उलाढाल ही कंपनी अमेरिकेत साधारणपणे तीन महिन्यांत करते. त्यामुळे अशा दिग्गज कंपनीला तोंड देण्यासाठी भारतातील अनेक रिटेल कंपन्यांबरोबरच फक्त रिलायन्स रिटेल ही एकमवे कंपनी अशी मानली जाते की, ती थेट वॉलमार्टला टक्कर देऊ शकेल. मुकेश अंबानी यांनी गेल्या काही वर्षांत अनेक खो-यांतून तेलाच्या विहिरीही हस्तगत केल्या आहेत. या माध्यमातून ते तेल आणि नैसर्गिक वायूची निर्मिती करणार आहेत. तर अनिल अंबानी यांनी भांडवली बाजार आणि ऊर्जा क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या दोन्ही भावांनी नजिकच्या म्हणजे आगामी 50 वर्षांत भारताला नेमकी कोणती आणि कशाची गरज आहे, याचा वेध घेत ही गुंतवणूक केली आहे. आपल्याला आठवत असेल की, अनिल अंबानी यांनी त्यांच्या रिलायन्स पॉवरचा जो आयपीओ शेअर बाजारात आणला होता, त्याला किती भरीव प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. हा आयपीओ देशातील सर्वात मोठा आयपीओ होता आणि त्याचे सबस्क्रिप्शन तब्बल 72 पट झाले होते. त्यामुळे टाटा आणि बिर्ला यांच्यापाठोपाठ नव्हे तर रिलायन्स समुह येत्या 100 वर्षांत या दोन्ही उद्योगसमुहांच्या किमान 50 पट पुढे असेल, असा अंदाज उद्योग क्षेत्रातील मंडळी व्यक्त करत आहेत. रिलायन्सने व्यवयास करून घवघवीत नफा तर कमाविला, पण एक गोष्ट इथे विसरून चालणार नाही की, या कंपनीने अनेक भारतीयांना फक्त पैसा दाखविला नाही, तर त्यांना लखपतीही केले. आजही शेअर बाजारांत दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी गुंतवणूक तज्ज्ञ सल्ला देतात तो रिलायन्समधील गुंतवणुकीचाच. आज रिलायन्सच्या (दोन्ही भावांच्या अखत्यारित असलेल्या कंपन्यांच्या समभागांच्या किमती) समभागांच्या ज्या किमती आहेत, आणि गतकाळात त्यांच्या किमतीत ज्या पद्धतीने वाढ झाली आहे, ते पाहता आणि या कंपन्यांचे भविष्यात असलेल्या योजना लक्षात घेता या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात आगामी काही वर्षांत (100 वर्षे हा तर फार पुढचा काळ झाला) तब्बल 200 टक्क्यांपर्यंत वाढ भांडवलीबाजारातील तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
आता बिर्ला यांच्या एकूण उद्योगाबाबत बोलायचे झाल्यास, बिर्ला यांनीही आपल्या परंपरागत व्यवसायाची व्याप्ती वाढवून ते दूरसंचार, रिटेल अशा भविष्यवेधी व्यवसायात उतरले आहेत. टाटा आणि रिलायन्सच्या तुलनेत बिर्ला समुहाचा वेग आणि उलाढाल तुलनात्मकदृष्ट्या कमी असली तरी, विश्वासाच्या बाबतीत तेही अजिबात मागे नाहीत. बिर्ला समुहात झालेल्या विभाजनामुळे त्यांच्या काही उद्योगात भरभराट दिसते तर काही उद्योग स्थिरगतीने पुढे जाताना दिसतात. अर्थात आगामी काही वर्षे बिर्ला यांचे नाव निश्चितच दिमाखात भारतीय कॉर्पोरेट उद्योगात झळकेल. पण ज्या पद्धतीने त्यांनी भूतकाळात व्यवसाय केला आणि भरभराट प्राप्त केली ते लक्षात घेतले तर आगामी काळात तितक्या वेगाने त्यांची भरभराट होईल असे वाटत नाही, असे मत व्यवसाय क्षेत्राचा अभ्यास करणारी मंडळी व्यक्त करत आहेत.
ही उद्योग घराणी कशी आणि किती पुढे जातात, हे कालौघात स्पष्ट होईल. मात्र या लेखाच्या विषयाच्या निमित्ताने काही गोष्टींवर प्रकर्षाने विचार करायला हवा. त्या अशा की, जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतरही आज आपल्या देशाची ओळख कृषीप्रधान देश अशी आहे. तसंच काही प्रमाणात उत्पादन क्षेत्रातील कंपन्याही आपल्याकडे तेजीत आहेत. मात्र भारतीय उद्योगांत होत असलेल्या घडामोडी आणि स्थित्यंतर लक्षात घेता 100 नव्हे तर आणखी 50 वर्षांतच आपली कृषीप्रधान देश अशी असलेली ओळख पुसली गेली तर आश्चर्य वाटायला नको. याचे कारण स्वाभाविक आहे. वर नमूद केल्याप्रमाणे आजच्या घडीला देशाच्या विकासदरात 58 टक्के वाटा हा सेवाक्षेत्रातून येत आहे. येत्या काही वर्षांत या वाट्याचे प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत जाईल. तसंच उर्वरित वाटा हा रिटेल, दूरसंचार, पायाभूत सुविधा, हॉस्पिटॅलिटी उद्योग अशा अन्य उद्योगांतून भरून येईल. अर्थात देशातून शेती हद्दपार होईल, असं म्हणणं धाडसाचं होईल. पण आज ज्या प्रमाणात शेतीमालाची आयात होत आहे, आणि या आयातीचे प्रमाण ज्या पद्धतीने वाढत आहे, त्या आकडेवारीकडे लक्ष टाकले तर आपण किती प्रमाणात आणि नेमकी कशाची शेती करणार आहोत, या एक संशोधनाचा विषय ठरू शकेल. आजही आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर शेती होते. पण शेतीमधील मूलभूत संशोधन, त्यातील नवी गुंतवणूक यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. त्यातच सेवा क्षेत्रात असलेल्या संधी आणि पैसा लक्षात घेऊन शेती व्यवसाय करणा-या घरातील लोकही मोठ्या प्रमाणावर सेवा क्षेत्राकडे वळत आहेत. त्यामुळे आगामी 100 वर्षांत भारतीय उद्योगाचे मोठ्य़ा प्रमाणावर कॉर्पोरटायझेशन झालेले असेल. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो असा की, आपल्याकडे ज्या पद्धतीने विविध क्षेत्रातील व्यवसाय येत आहेत, आणि त्यांची वृद्धी होत आहे, त्या प्रमाणात त्या उद्योगाचे प्रशिक्षण देणा-या संस्था निर्माण होताना दिसत नाहीत. विशेषतः विज्ञान क्षेत्राच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध संशोधन जयंत नारळीकर यांनी भारतात विज्ञानातील मूलभूत संशोधनात विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याची खंत व्यक्त केली होती. कारण आज जी प्रगती झालेली दिसते त्यात केवळ आणि केवळ विज्ञानक्षेत्राचा वाटा मोलाचा ठरला आहे. गतकाळात विज्ञान क्षेत्रात झालेल्या संशोधनाचा वेध घेत समांतर काळात भारतात निर्माण झालेले उद्योग लक्षात घेतले तर बरीच उकल होईल. मात्र हाच विचार वर्तमानात केला तर निश्चित समजेल की, आपण कुठे आहोत.
आजच्या घडीला भारत महासत्ता होणार हे निर्विवाद आहे. भारताबरोबरच आशिया खंडातील दुसरा महासत्ता होण्याच्या मार्गावर असलेला देश म्हणजे आपला शेजारी चीन. नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा उदघाटन सोहळा ज्या भव्य प्रमाणात झाला ते लक्षात घेता ते कुठे आहेत आणि आपण महासत्ता बनण्याच्या महामार्गावर नेमके कुठे आहोत, याचा अंदाज येईल. स्पर्धा केवळ चीनशी नाही, तर आपली स्पर्धा आपल्याशीच आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताच्या नवनिर्माणाचे शिल्पकार पंडित नेहरू यांनी भविष्याचा विचार करत आय.आय.टी, बी.ए.आर.सी, अशा एक ना अनेक वैज्ञानिक संस्था स्थापन केल्या. मात्र आजच्या 60 च्या उंबरठ्यावर असलेल्या भारतात पंडित नेहरू यांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या पलीकडे नवनिर्मिती झालेली खचितच आढळते. त्या काळी नेहरूंच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या संस्थांमुळे आज आपण प्रगतीचे आणि यशाचे अनेक टप्पे गाठले आहेत. मात्र यशाची अशीच आणखी शिखरं सर करायची असतील, तर आपल्याला अशा संस्थांची निर्मिती करणे गरजेचे ठरणार आहे. आज ज्या वेगाने आज भारतीय उद्योगाचा विस्तार होत आहे, ते पाहता 100 वर्षानंतरचा भारतीय उद्योग कसा असले याचे चित्र रेखाटणे खरतरं अशक्य आहे. मात्र तरीही 100 वर्षांनंतर भारतीय उद्योगाचा जो चेहरा असेल त्याचे रेखाटन आताच होत आहे, यात शंका नाही. रिलायन्स, टाटा किंवा अन्य कुणी या उद्योगांनी आपल्या उद्योगाचे स्वरूप केवळ कॉर्पोरेट नसेल. या उद्योगांनी मानवी जीवनाच्या गरजा लक्षात घेत या गरजांची पूर्तता करणा-या घटकांच्या निर्मितीत गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या शाश्वत गुंतवणुकीचा त्यांना मोठा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या घडीला असलेली देशाची लोकसंख्या ही एक मोठी समस्या आहे. काही प्रमाणात त्यावरही नियंत्रण मिळवण्यात यश आले तर त्याचाही फायदा एकाअर्थी उद्योगांना झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण अनेक शिखरे गाठत आहोत, पण आव्हानंही तेवढीच आहेत. 100 वर्षांत किती आणि कशा प्रकारची आव्हाने येतील, हे आत्ताच सांगणे कठिण आहे. पण ‘अनंत आमुची ध्येयासक्ती...अनंत आमुच्या आशा...किनारा तुला पामरा...सागरा, किनारा तुला पामराला’, अशी भारतीयांची वृत्ती असल्याने भारतीय व्यावसायिक जग जिंकल्याशिवाय राहणार नाहीत.